इंटू थीन एअर

06 May 2020

हिमालय - जगातील अत्युच्य उंचीची अनेक शिखरे असलेली आणि “रूफ ऑफ द वर्ल्ड” असे जिला संबोधले जाते अशी जगप्रसिद्ध पर्वतरांग. त्यातीलच सर्वात उंच पर्वत म्हणजे एवरेस्ट. जेव्हापासून एवरेस्टला सर्वात उंच शिखराचा दर्जा मिळाला तेव्हापासून ते गिर्यारोहकांना कायमच खुणावत आलं आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुमारास गिर्यारोहकांचे अनेक समूह एवरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करतात. अश्याच १९९६ सालच्या हंगामात एक वादळ निमित्त झालं आणि अनेकांची आयुष्ये कायमची बदलून गेली. Into Thin Air ही त्याची कहाणी.

या पुस्तकाचा लेखक, Jon Krakauer, हा एक अनुभवी गिर्यारोहक आणि पत्रकार. त्या साली तो स्वतः एका एवरेस्ट मोहिमेचा सदस्य होता. त्यामुळे मोहिमेच्या अगदी सुरुवातीपासून ते मोहिमेनंतरच्या अनेक घडामोडींविषयी या पुस्तकात सविस्तर वाचावयास मिळते. Krakauer ची गोष्ट सांगण्याची हातोटी उत्तम आहे. त्या हंगामातील घटनांची अतिशय सुसंबद्ध आणि खिळवून ठेवणारी अशी मांडणी त्याने केली आहे. अधून मधून अलंकारिक भाषेचा वापर केला आहे जी थोडी जड आहे. पण बहुतांश पुस्तक वाचावयास सोपे आहे.

अर्थातच या पुस्तकातील घटनांचे वर्णन हे लेखकाच्या दृष्टिकोनातून आहे. त्याविषयी अनेक मतांतरे ही आहेत. १९९६ सालच्या एव्हरेस्ट मोहीमांतील अनेकांनी पुस्तके लिहिली आहेत. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून घटनाक्रम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्वांत हे पुस्तक व्यापक आणि सर्वसामान्य वाचकांस वाचावयास सोपं मानलं जातं.

मला एवरेस्ट बद्दल आणि ते सर करण्याच्या मोहिमांबद्दल लहानपणापासून बरंच कुतूहल होतं. १९९६ च्या हंगामाविषयी वाचल्यानंतर त्याविषयी अधिक जाणून घ्यायची उत्सुकताही होती. त्यामुळे हे पुस्तक वाचावयास घेतलं. हे पुस्तक वाचण्याआधी एवरेस्ट सर करणं म्हणजे अतिशय खडतर काम आणि फक्त अनुभवी गिर्यारोहक ते सर करतात अशीही काहीशी समजूत होती. पण वास्तव याहून बरंच वेगळं आहे याची जाणीव हे पुस्तक वाचून झाली. हिमालयातील गिर्यारोहण मोहिमांचा अविभाज्य भाग असणारे शेर्पा, एवरेस्ट वरील डेथ झोन, ग्रीन बूट्स अशा अनेक घटकांविषयी नवीन माहिती मिळाली.

गिर्यारोहणशी संबंधित “Touching The Void” हे पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचलं होतं, त्या तुलनेत हे पुस्तक अधिक खिळवून ठेवणारं आहॆ. हे पुस्तक खरं तर मी Audible वर ऐकलं. Phillip Franklin ने ते उत्तमरीत्या कथन केलं आहे. परंतु ebook किंवा paperbook स्वरूपातही ते तितकेच खिळवून ठेवणारे असेल अशी खात्री वाटते. जर तुम्हाला गिर्यारोहणाची आवड असेल आणि एवरेस्ट मोहिमांविषयी विषयी कुतूहल असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.

इतरत्र प्रकाशित: