माडिया गोंड आदिवासींना मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावे आणि त्यांची होणारी पिळवणूक थांबावी या भूमिकेतून बाबा आमटेंनी हेमलकसाला लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली. वयाच्या बाविसाव्या वर्षी डॉ. प्रकाश आमटे यांनी त्याची धुरा हाती घेतली आणि तो यशस्वी करून दाखवला. प्रकाशवाटा म्हणजे प्राण्यांविषयी लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्राणी पाळणे, पाण्याविषयी लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी भोवऱ्यात उडी मारणे असे अनेक विलक्षण प्रयोग करणाऱ्या या अवलियाची गोष्ट.
लोकबिरादरी प्रकल्पासाठी जेव्हा त्यांना जमीन मिळाली तेव्हा तेथे फक्त जंगल होते. त्यामुळे अगदी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यापासून सुरुवात करावी लागली. अतिशय दुर्गम अशा या भागात त्या काळी ना संपर्काची साधने उपलब्ध होती ना दळणवळणाची सोय. पहिली १७ वर्षे तर वीजही नव्हती. पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन काही महिने बाहेरच्या जगाशी संपूर्णपणे संपर्क तुटायचा. जंगलात डासांचा सुळसुळाट, त्यामुळे पहिल्या वर्षी सर्वांना मलेरिया झाला. तिथल्या पाण्यामुळे आजारी पडणं तर सामान्य बाब. जंगलात राहताना एकटेपणा ही यायचा. सगळेच कुटुंबापासून दूर राहत होते, त्यामुळे मतभेद झाले तर मन मोकळे करायला किंवा सल्ला मागायलाही कुणी नव्हते. सर्वांसाठी एकाच स्वयंपाकघर, त्यामुळे जे स्वयंपाकी करेल तेच सर्वांना खावे लागे. सुरुवातीला तर सर्व कार्यकर्ते चक्क झाडाखालीच झोपायचे, नंतर सर्वांसाठी एक झोपडी बांधण्यात आली. सगळ्यांना या परिस्थितीचा त्रास झाला, पण सर्व त्यातून मार्ग काढायलाही शिकले आणि त्यामुळेच एकमेकांच्या जवळ आले.
आदिवासींची जीवनशैली, त्यांची सहनशीलता, जगण्याविषयीचा व्यावहारिक दृष्टिकोन यांचीही बरीच उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतात. सुरुवातीला तर हे आदिवासी प्रकल्पावर फिरकतही नसत. त्यांच्यातील अंधश्रद्धा, चालीरीती, बाहेरच्या माणसांनी वर्षानुवर्षे केलेले शोषण अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या मनात बाहेरच्यांविषयी अविश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेल्या धडपडीचेही वर्णन या पुस्तकात वाचावयास मिळते. अगदी त्यांची भाषा शिकण्यापासून ते त्यांच्यासाठी शाळा सुरु करण्यापर्यंत. आदिवासींचाही त्यांच्या जीवनशैलीवर बराच प्रभाव पडला. आधीच आमटेंचे राहणीमान साधे होते, आदिवासींकडे बघून त्यांनी आपल्या गरज अजून कमी केल्या.
वैद्यकीय सेवा पुरवण्यातही अनेक अडचणी आल्या. तिथे कोणी specialist डॉक्टर नव्हते. त्यामुळे सगळ्या दुखण्यांवर, अगदी डोळ्यांपासून हाडांपर्यंत, प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनाच उपचार करावे लागत. इतर मेडिकल स्टाफ ही नसल्यामुळे कार्यकर्त्यांनाच प्रशिक्षण दिले गेले. पशुवैद्य नसल्याने प्राण्यांवरही उपचार केले. वीज नसल्याने कंदिलाच्या प्रकाशात कित्येक ऑपरेशन्स केली. एखाद्या आजाराविषयी किंवा उपचार पद्धतीविषयी माहिती नसेल तर पुस्तकात वाचून उपचार केले. इतर कुठेही सापडणार नाही अशा अविश्वसनीय केसेस चे वर्णन प्रकाशवाटा मधे वाचावयास मिळते.
थोडक्यात काय, तर आपल्याकडे startup culture लोकप्रिय होण्याआधी आमटेंनी सुरु केलेली ही startup. येथे कोणीही प्रमुख नव्हता, सर्वच कार्यकर्ते(flat hierarchy). अंगावर पडेल ते काम करून, त्यासाठी जरुरी ती कौशल्ये स्वतःच आत्मसात करून आणि येणाऱ्या सर्व अडचणींवर उपलब्ध संसाधने वापरून मार्ग काढून या सर्वानी लोकबिरादरी प्रकल्प यशस्वी करून दाखवला.
हा प्रकल्प यशस्वी करण्यात प्रकाश आमटेंबरोबरच त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे, भाऊ विकास आमटे, सुरुवातीचे त्यांचे सहकारी अशा अनेकांचा सिंहाचा वाटा आहे. या प्रकल्पात जसे अनेक व्यक्तिंचे योगदान लाभले, तसे काहींनी खोडा घालण्याचा प्रयत्नही केला. परंतु पुस्तकात कोणावरही टीका करताना त्या व्यक्तीचे नाव घेतलेले नाही, मात्र प्रकल्पास ज्यांची मदत झाली त्यांची स्तुती मात्र नाव घेऊन केली आहे.
या प्रकल्पाव्यतिरिक्त आमटेंचे बालपण आणि जडणघडणीच्या अनेक प्रसंगांचे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे खरंतर प्रकाश आमटेंच्या जीवनातील अनेक किस्स्यांचा संग्रहच. यातील काही खळखळून हसवतात, तर काही डोळ्यातून टचकन पाणी आणतात. हे सर्व किस्से एकेमकांमध्ये सुसंबद्धपणे गुंफून आमटेंनी हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाची आणि त्यांच्या जीवनाची गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या या प्रवासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे हे पुस्तक जरूर वाचावे. अगदीच काही नाही तर अनेक गोष्टींविषयी एक नवा दृष्टिकोन नक्की मिळेल.
इतरत्र प्रकाशित: