प्रिसनर्स ऑफ जिओग्राफी

13 Dec 2020

जेव्हा बातम्यांमध्ये जागतिक घडामोडी दाखवल्या जातात तेव्हा त्यांचा भर सहसा तेथील लोक, राजकीय नेते आणि चळवळी यांवर असतो. यांव्यतिरिक्तही असा एक महत्वाचा घटक आहे ज्याचा या घडामोडींवर प्रभाव असतो, तो म्हणजे त्या प्रांताची भौगोलिक संरचना. देश कितीही बलाढ्य असला आणि त्याचे नेते कितीही महत्वाकांक्षी असले तरी भौगोलिक परिस्थितीमुळे येणाऱ्या मर्यादांवर मात करणे सहजासहजी शक्य होत नाही - या संकल्पनेवर हे पुस्तक आधारित आहे.

या पुस्तकात लेखकाने जगाच्या नकाशाचे दहा प्रमुख भाग केले आहेत - रशिया, पश्चिम युरोप, अमेरिका, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, मिडल ईस्ट, चीन, भारतीय उपखंड, जपान व कोरिया आणि आर्क्टिक. यातील प्रत्येक भागाची भौगोलिक रचना, तिचा तेथील विकासावर आणि राजकारणावर कसा परिणाम झाला आहे याचे थोडक्यात वर्णन केले आहे. याव्यतिरिक्त, युरोपियन राष्ट्रांचा वसाहतवाद, त्यांनी आपल्या सोयीसाठी केलेल्या रचनांचा पडलेला प्रभाव, चीनचा आधुनिक वसाहतवाद यावरही लेखकाने भाष्य केले आहे.

या पुस्तकातून ओळख झालेली आणि आवर्जून नमूद करावीशी गोष्ट म्हणजे Mercator projection system. बहुतेक नकाशे हे या system वर आधारित आहेत. दळणवणासाठी हे नकाशे सोयीचे असले तरी त्यांचा एक side-effect म्हणजे, एखादा प्रदेश विषुववृत्तापासून जेवढा लांब तेवढा तो तुलनेने अधिक मोठा वाटतो. उदाहरणार्थ - आफ्रिका आणि ग्रीनलँड हे नकाशात ढोबळमानाने समान आकाराचे दिसले तरी प्रत्यक्षात आफ्रिका क्षेत्रफळाने ग्रीनलँड पेक्षा १४ पट मोठा आहे. https://thetruesize.com/ या संकेतस्थळावर जाऊन interactive पद्धतीने हे तुम्ही पाहू शकता.

हे पुस्तक म्हणजे जागतिक भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीची तोंडओळखच. ते वाचून अनेक प्रदेशांविषयी नवीन आणि रोचक माहिती मिळाली. जागतिक घडामोडी या केवळ trivia न राहता त्यांचा अर्थ नव्याने समजायला लागला. Geo-politics या काहीश्या क्लिष्ट अशा विषयावर हे पुस्तक असले तरी वाचताना कुठेही कंटाळवाणे वाटले नाही. जर तुम्हाला जगातील विविध प्रदेशांची भौगोलिक संरचना आणि त्याचा तेथील लोकांच्या जीवनावर आणि राजकारणावर कसा परिणाम झाला आहे हे थोडक्यात जाणून घ्यायचे असेल तर हे एक उत्तम पुस्तक आहे. हो मात्र हे पुस्तक वाचताना जगाचा नकाशा जवळ असू द्या.

इतरत्र प्रकाशित: